सभा प्रचंड यशस्वी : संदीप क्षीरसागर यांचे मिशन फत्ते
बीडच्या सभेवरून थेट केंद्र व राज्य सरकारवर साधला निशाणा, बंडखोरांनाही खडेबोल सुनावले
By MahaTimes ऑनलाइन | रईस खान
बीड : भाजप एकीकडे स्थिर सरकार देण्याची घोषणा करते, तर दुसरीकडे जनतेने निवडून दिलेले सरकार पाडते. केंद्रावर भरोसा करून चालणार नाही. आता सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना रोखण्याची योग्य वेळ आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरु वारी बीडमध्ये आयोजित स्वाभिमान सभेत बोलतांना केले.

बीड शहरातील माने कॉम्प्लेक्सच्या मैदानावर आज गुरूवारी आयोजित एका भव्य सभेला संबोधित करताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी बीडच्या सभेवरून थेट केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला. सत्तेसाठी राष्ट्रवादी सोडून सत्तेसोबत गेलेल्या बंडखोरांनाही त्यांनी खडेबोल सुनावले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री फौजिया खान, आमदार रोहित पवार, मा.आ.उषा दराडे, सुदामती गुट्टे, सय्यद नवीदुज्जमा, सुशीला मोराळे, बबन गिते, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष व आमदार संदीप क्षीरसागर, मा.आ.सय्यद सलीम आदी उपस्थित होते.

या सभेस जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, राजेश टोपे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सय्यद सलीम यांनी आपल्या भाषणातुन भाजप आणि बंडखोरांवर निशाणा साधला.श्री. पवार पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते म्हणाले होते की ”मी पुन्हा येईन… पुन्हा येईन…”असे म्हणाले होते देवेंद्र पुन्हा आले पण मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर उपमुख्यमंत्री म्हणून. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुन्हा येणार असल्याचे सांगितले आहे, मात्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घ्यावा, असा उपरोधिक टोला ही शरद पवार यांनी लगावला. माझे वय झाले असे म्हणणाऱ्यांना माझ्यात काय दिसलं, असं म्हणत बंडखोरांना चांगलेच फटकारले.

आता वेळ आली आहे, जेव्हा मतदारांना मतदान करण्याची संधी मिळाली तर ते मतदान यंत्रांवर कोणती बटणे दाबतील आणि ते तुम्हाला (बंडखोर) कुठे पाठवतील, हेही त्यांना कळणार नाही. सत्तेच्या बाजूने जायचे असेल तर तडजोड न करता जा, पण ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले त्यांच्याप्रती माणुसकी ठेवा, अन्यथा जनता तुम्हाला धडा शिकवेल, असा इशाराही शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सत्ताधाऱ्यांसोबत जाणाऱ्या नेत्यांना दिला. काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भाषणात आमदार संदीप क्षीरसागर यांचे कौतुक केले. संदीप क्षीरसागर व त्यांच्या साथीदारांनी मोठ्या कष्टाने या बैठकीचे नियोजन केले. त्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे आभारही मानले.
मी सदैव शरद पवार साहेबांच्या पाठीशी – संदीप क्षीरसागर
शरद पवार हे लोकनेते आहेत. पक्ष आणि त्यांच्या नेत्या विरुद्ध बंड करून अनेकांनी साथ सोडली. पण मी त्याच्या पाठीशी उभा राहिलो. मी काही दिवसात प्रसिद्ध झालो. आमदार झाल्यानंतरही माझे जेवढे स्वागत सत्कार झाले नाही तेवढे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर झाले. ही माझी जादू नसून पवारांची जादू आहे. सभेच्या पूर्वतयारीत मी जिथे जिथे सभा घेतली तिथे एवढी गर्दी जमली की बैठकीला सभेचे स्वरूप आले. मी केशर काकूंनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहे, मी शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहीन. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांनी ‘साहेबाचा नाद नाही करायचा नाही..’ असा डायलॉग मारणाऱ्यांनी ही त्यांची साथ सोडली. यावेळी उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या गजरात संदीप क्षीरसागर यांचे स्वागत केले. Beed Swabhiman sabha / BJP is destroying the government elected by the people – Sharad Pawar