दुष्काळ, अग्रीम, विकासकामांसह विविध विषयासंदर्भात चर्चा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थिती, बीड व शिरूर तालुक्यातील अग्रीम विम्यातून वगळण्यात आलेली मंडळे तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्न यांच्या संदर्भात बुधवार (दि.६) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी संबंधित विषयांवर चर्चा करून संबंधितांना योग्य ते निर्देश देऊन कार्यवाही करण्यात आली.

बीड मतदार संघासह जिल्ह्यातील विविध विषय, अडचणी यांच्यावर प्रशासकीय स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासोबत बुधवारी (दि.६) रोजी बैठक घेतली. या बैठकीत, बीड जिल्ह्यातील कोरड्या दुष्काळाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील तलावांमध्ये अत्यल्प पाणी साठा असल्याने जे उपलब्ध पाणी आहे ते नागरीक व पशुधनाच्या वापरासाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. सद्यस्थितीला नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बहुतांश ठिकाणी टँकर ने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. तसेच पावसाअभावी पिके गेल्याने जिल्ह्यातील पशुधनाच्या चार व पाण्याचा देखील प्रश्न हळूहळू डोके वर काढत आहे. जिल्ह्यातील पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्या सुरु करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून, दुष्काळी परिस्थितीत आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करण्यात याव्या. अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे केली. तसेच बीड मतदारसंघासाठी जास्तीत जास्त विकासनिधी देण्याबात चर्चा करून प्रस्ताव दाखल केला. यावेळी आ.क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी महोदयांशी, जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. या बैठकीसाठी माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस प्रा.सुशीलाताई मोराळे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते
अग्रीम मधून वगळलेल्या मंडळांचा समावेश करण्याबाबत चर्चा
बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांतर्गत असलेल्या बीड तालुक्यातील नाळवंडी, म्हाळसजवळा, पाली हि महसूल मंडळे तर शिरूर (कासार) तालुक्यातील खालापूरी, खोकरमोहा, पाडळी हि महसूल मंडळे अग्रीम मंजुरीतून वगळण्यात आली आहेत. या महसूल मंडळांमध्येही अग्रीम मंजुरीस पात्र असलेले निकष पूर्तता करणारी परिस्थिती आहे. याठिकाणीहि शेतीपिकांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. तरीही हि मंडळे अग्रीम मंजुरीतून वगळले आहेत. या मंडळातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून हि महसूल मंडळे अग्रीम मंजुरीत समाविष्ट करावीत. तसेच जिल्ह्यात सर्वत्रच कोरड्या दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे जी महसूल मंडळे अग्रीम मंजुरीतून वगळण्यात आली आहेत त्या मंडळांचा अग्रीम मंजुरीत समावेश करण्यासाठी संबंधितांना निर्देश देऊन कार्यवाही करावी अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली.
वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा
सध्या दूष्काळजन्य परिस्थीती उद्भवली असल्याने सगळीकडे पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. बीड नगरपालिकेकडे खूप मोठ्या रकमेत महावितरणची थकबाकी असल्याने महावितरणकडून नगरपालिकेचे वीज कनेक्शन वारंवार बंद केले जाते. त्यामुळे बीड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. सध्यातरी नगरपालिकेचे वीज कनेक्शन बंद करून नये, जेणेकरून शहरवासीयांना विजेअभावी पाण्याची महत्वाची अडचण होऊ नये. तसेच ग्रामीण भागातही पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवावा. शहरातील व ग्रामीण भागातील बंद रोहीत्र तातडीने चालू करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भातही, जिल्हाधिकारी यांच्या समक्ष महावितरणच्या अधिकाऱ्यांशी आ.संदीप क्षीरसागर यांनी चर्चा केली.