जिल्ह्यात 156 केंद्रांवर 42 हजार 464 विद्यार्थी देणार परीक्षा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : Maharashtra SSC Board Exam 2024 : राज्यात इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून (1 मार्च) सुरुवात होत आहे. 1 ते 26 मार्च या कालावधीत पार पडणार आहे. या परीक्षेसाठी बीड जिल्ह्यात एकूण 42 हजार 464 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीय. ही परीक्षा 156 केंद्रावर दहावीची परीक्षा होत आहे. परीक्षेदरम्यान कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

मार्च 2024 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10वी) परीक्षेची आवेदनपत्रं ऑनलाईन पध्दतीनं स्विकारण्यात आली. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रं स्विकारण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी परीक्षेदरम्यान बहुतांश विषयांच्या पेपरमध्येसुट्टी ठेवण्यात आली आहे. परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचारानं किंवा परीक्षेच्या भितीनं मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलीय. तसंच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शंका दूर करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बैठे पथक कार्यरत राहणार
परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचेपर्यंत, उत्तरपत्रिका आणण्याकरीता नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (रनर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणं आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर यावं
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यामिक शाळांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. गतवर्षीप्रमाणेच मार्च 2024 परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत. तसंच पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलती देण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यासाठी संबंधितांनी विभागीय मंडळाची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे.
