By MahaTimes ऑनलाइन |
बीड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी बीड जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये आनंद एल.यावलकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांचे मार्गदर्शनाखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर लोकन्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखल पूर्व प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवता येतील. संबंधित पक्षकारांनी आपल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी येत्या 13 डिसेंबर 2025 रोजी आयोजित केलेल्या लोकअदालतीमध्ये आपले प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावे असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर डब्ल्यू. ए. सय्यद यांनी केले आहे.
या पूर्वी दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या लोकन्यायालयामध्ये संपूर्ण बीड जिल्हयातून प्रलंबित व दाखलपूर्व असे एकूण 47,558 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी 1301 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यामध्ये जवळपास 15 कोटी 68 लाख 66 हजार 605 रूपयांच्या प्रकरणामध्ये तडजोड झाली. सदरचे लोकन्यायालय यशस्वी करण्याकरिता जिल्हा वकील संघ व सर्व तालुका वकील संघ, पदाधिकारी, विधिज्ञ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
त्याप्रमाणे येणा-या 13 डिसंेबर 2025 रोजी होणा-या लोकन्यायालयाबाबत बोलताना न्यायाधीश डब्ल्यू. ए. सय्यद म्हणाले की, लोक अदालतच्या निवाडयाविरूध्द अपील नाही, एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते, खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो, लोक अदालतीत होणारा निवाडा हा आपसात समजूतीने होत असल्याने कुणाची हार वा जीत होत नाही. लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो, परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील व्देष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोक अदालतीत होणा-या निवाडयाची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते, वेळ पैसा यांची बचत होते, इतकेच नव्हे तर लोक अदालतीत निकाली निघणा-या प्रकरणांमध्ये कायदयानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते. आपली प्रलंबित तसेच दाखल व्हावयाचे आहेत अशी प्रकरणे लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरता संबंधित न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा आणि लोक अदालतीमध्ये सहभागी होउन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत असे आवाहन न्यायाधीश सय्यद यांनी केले आहे.
