▪️पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : पैठण येथील कार्यक्रमावरून परत येताना मांजरसुंबा बायपास मार्गावर मध्यरात्री वाहन बंद पडल्याने एका कुटुंबावर संकट ओढावले. मात्र वेळेवर पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिस उपनिरीक्षक श्री. गुंड, पोलीस कॉन्स्टेबल जाधव आणि वाहनचालक चव्हाण यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे कुटुंब सुखरूप घरी पोहोचले.
बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील रहिवाशी अरुण संतराम पवार हे पत्नी व दोन मुलांसह रात्री सुमारे १ ते सव्वा १ वाजता बीड बायपासमार्गे येत असताना मांजरसुंबा येथे अचानक त्यांच्या वाहनाने साथ सोडली. वाहन सुरू न झाल्याने कुटुंब घाबरले आणि वाहनातच थांबावे लागले. दरम्यान पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी मदत केली.
परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी परिसरात जाणाऱ्या वाहनांकडून मदतीचा प्रयत्न केला. तसेच फिटरला संपर्क साधला; मात्र मध्यरात्री कोणी उपलब्ध झाले नाही. अखेर तिघांनीही सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहन ढकलून सुरू करण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रयत्नांनंतर वाहन सुरू झाले. “या वेळी तुम्हाला सोडून आम्ही जाऊ शकत नाही,” असे सांगत पोलिसांनी सुरक्षिततेची खात्री केली.
या घटनेबाबत पवार यांनी पोलिसांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. “वेळीच पोलिस मदत मिळाल्याने आम्हाला देवदूत भेटल्यासारखे वाटले. अन्यथा काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संबंधित तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांच्या या तत्पर व माणुसकीपूर्ण कार्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे.
