मांगवडगाव तिहेरी हत्याकांड
अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
केज तालुक्यातील मांवडगाव मध्ये मे 2020 मध्ये पारधी समाजातील व्यक्ती आणि दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर आठ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा निकाल अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचे द्वितीय सत्र न्यायाधीश श्री. व्ही.के.मांडे यांनी बुधवारी दिला.

सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत उर्फ पिंटू मोहन निंबाळकर, बाळासाहेब बाबुराव निंबाळकर, राजाभाऊ हरिश्चंद्र निंबाळकर, जयराम तुकाराम निंबाळकर अशी शिक्षा झालेल्या पाच आरोपींची नावे आहेत.
हकीकत अशी की, तक्रारदार आणि आरोपीमध्ये जमिनीचा जुना वाद होता. या वैमनस्यातून 2006 साली आरोपींनी मयत बाबू शंकर पवार याला मारहाण केली होती. हे प्रकरण न्यायालयात गेले, न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय दिला. याचा राग मनात धरुन दि.13 मे 2020 रोजी सायंकाळी फिर्यादी मयत बाबू शंकर पवार व त्यांचा मुलगा, सून असे सर्वजण ट्रॅक्टरमध्ये जीवनावश्यक साहित्य भरून त्यांच्या जमिनीवर गेले.
याचा राग आल्याने आरोपी पक्षाच्या लोकांनी त्याच्यावर शस्त्रे आणि दगडांनी हल्ला चढवला. तसेच त्यांचा ट्रॅक्टर आपल्या ताब्यात घेऊन अंगावर चढवला. या घटनेत बाबू शंकर पवार (वडील) व दोन मुले संजय बाबू पवार, प्रकाश बाबू पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिलेसह धनराज बाबू पवार, सुरेश शिवाजी पवार, शिवाजी बाबू पवार, संतोष संजय पवार हे गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी धनराज बाबू पवार यांच्या फिर्यादीवरून कलम ३०२, ३०७, १२० ब, ३२५, १४३, १४७, १४८, १४९, ४३५, ४२७, ३२३ भादंवि. हतियार प्रतिबंधक कलम ४, २५ व एट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास तपास अधिकारी राहुल धस यांनी पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले. हल्ल्यातील जखमी, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी आदींच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे दाखल केलेले सबळ पुरावे व साक्षीदारांच्या आधारे दुसरे सत्र न्यायाधीश श्री. व्ही.के. मांडे यांनी पाच आरोपींना दोषी ठरवून वरील शिक्षा सुनावली. या प्रकरणात एकूण 14 आरोपी होते. यापैकी पाच जणांना शिक्षा झाली. एक खटला प्रलंबित होता त्या दरम्यान मृत झाला. तर इतर आठ जणांवर आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणी शासनाच्या वतीने ऍड. ए.व्ही.कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. त्यांना ऍड. आर. एम. ढेले आणि ऍड. नितीन पुजदेकर यांना पोलिस पैरवी अधिकारी गोविंद कदम, पोलिस हवालदार बाबुराव सोडगीर यांनी सहकार्य केले.
