दम्याच्या रुग्णांमध्ये होतेय वाढ! वाचा काय आहेत या आजाराची कारणे, लक्षणे व उपाय…
By MahaTimes ऑनलाइन |
दमा हा फुप्फुसातील श्वास वाहिन्यांशी संबंधित आजार असून, यात विशेषतः श्वास सोडण्यास त्रास जाणवतो. दम्याला अस्थमादेखील संबोधतात. अलीकडल्या काळात दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तुम्हाला वारंवार शिंका येणे, सर्दी होणे, नियमित खोकला येणे, रात्रीचा सुका खोकला येणे, छातीमध्ये घरघर होणे किंवा घशातून शिट्टी सारखा आवाज येणे, दम लागणे अशी लक्षणे असतील तर दमा असू शकतो.

दम्याची कारणे दम्याचा आजार होण्याची अनेक कारणे आहेत. अनुवांशिकता हे दम्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. दमा होण्यासाठी अॅलर्जी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असेल व त्या गोष्टीचा वारंवार संपर्क आला अथवा अॅलर्जी असलेल्या गोष्टींचे सेवन केले, तर रक्तातील काही घटक वाढतात. त्यातील ‘इसोनिओफिल’ नामक घटक वाढतो. त्यामुळे श्वासवाहिन्यांवर सूज येते.
दम्याची लक्षणे श्वसनवाहिन्यांवर आलेल्या सुजेमुळे व आतल्या स्रावामुळे फुप्फुसाच्या क्रियान्वयनात अडथळा येतो. त्यामुळे दम लागत असतो. अशा वेळी जे कार्य आपण पूर्वी करीत होतो, तेच आता करताना अधिक त्रास जाणवतो. पूर्वी घरात एक मजला चढून जाताना दम लागत नसे; मात्र नंतर तोच एक मजला चढून गेले तरी दम लागतो. हा दम्याचा त्रास असू शकतो. याशिवाय घरकाम करताना उडणाऱ्या धुळीमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या धुळीमध्ये अनेक अॅलर्जीकारक घटक असतात. त्यातील प्रमुख म्हणजे ‘हाउस डस्ट माइट’. धुळीमुळे अनेक लोकांना अॅलर्जी होऊन दमा होतो.

दम्याचे निदान कसे होते?
दम्याचे निदान होण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. आपणास वारंवार सर्दी होणे, शिंका येणे, घशातून खरखर आवाज येणे, वातावरण बदलल्यावर सर्दी-खोकल्याचा प्रादुर्भाव होणे अशी लक्षणे आढळून आली तर तातडीने डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. डॉक्टर वैद्यकीय परीक्षण करून दम्याचे निदान करतात. या वेळी ते परिवारात कुणाला दमा आहे का आदींची विचारणा करतात. ‘पीक-फ्लो’ मीटर नामक यंत्राद्वारे तुमची हवा फुंकण्याची क्षमता तपासून फुफ्फ्साची क्षमता तपासली जाते. त्यामुळे दमा आहे की नाही याचे प्राथमिक निदान करता येते.
वातावरणाचा आणि दम्याचा फार जवळचा संबंध
वातावरणाचा आणि दम्याचा फार जवळचा संबंध आहे. धूळ व प्रदूषणयुक्त वातावरणदेखील दम्याचा आजार होण्यास पोषक असतात. याशिवाय नियमित होणारे व्हायरल इन्फेक्शन (स्वाइन फ्ल्यू आणि आता कोव्हिड-19) दम लागण्यास कारणीभूत ठरत आहे. तुम्हाला धुळीमुळे, थंडीमुळे त्रास होत असेल तर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, छातीचा एक्सरे, पीएफटी (फुप्फुसांची क्षमता) करून आजच मोकळ्या श्वासाला सुरुवात करा.
डॉ सुनिल वाघमारे
श्वसन विकार तज्ञ,
पल्स हॉस्पिटल, बीड.

