राष्ट्रपतींसह पंतप्रधान आणि इतर नेत्यांची श्रद्धांजली
By MahaTimes ऑनलाइन |
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचं गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. मुलायम सिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसेच १९९६ ते १९९८ दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होते. १९९२ साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ५ डिसेंबर १९८९ रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते २४ जानेवारी १९९१ पर्यंत या पदावर कार्यकरत होते. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच ५ डिसेंबर १९९३ रोजी मुलायम सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.
1967 साली उत्तर प्रदेशच्या जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक जिंकणारे मुलायम सिंह यादव 1989 साली उत्तर प्रेदशचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 1993 मध्ये दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री बनले. 1996 रोजी मुलायम सिंह यादव यांनी मैनपूरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 1996 ते 1998 युनायटेड फ्रंट सरकारच्या कार्यकाळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही काम केलं. यानंतर त्यांनी संभल आणि कन्नौज इथूनही लोकसभा निवडणूक जिंकली. 2003 साली ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. २९ ऑगस्ट २००३ रोजी यांनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच म्हणजेच चार वर्ष झाल्यानंतर ११ मे २००७ रोजी पदाचा राजीनामा दिला. 2019 साली त्यांनी पुन्हा मैनपूरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते जिंकले.
राष्ट्रपतींसह पंतप्रधान आणि इतर नेत्यांची श्रद्धांजली
मुलायम सिंह यादव यांच्या निधनाचे वृत्त येताच सोशल मीडियावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं. “मुलायम सिंह यादव यांचं निधन म्हणजे देशाचं नुकसान आहे. एका सामान्य घरातल्या मुलायम सिंह यादव यांचं यश मात्र असामान्य आहे. ‘धरती पुत्र’ मुलायमजी जमिनीशी नाळ असलेले एक दिग्गज नेते होते. सर्व पक्षाचे लोक त्यांचा सन्मान करत होते. त्यांच्या कुटुंबियांसह आणि समर्थकांसोबत माझ्या सहवेदना.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. मुलायम सिंह यादव यांच्याबाबत त्यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “मुलायम सिंह यादव हे उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व होतं. ते विनम्र आणि जमिनीवरील नेते म्हणून ओळखले जायचे. लोकांच्या समस्यांबाबत ते संवेदनशील होते. त्यांनी कायम तत्परतेने लोकांची सेवा केली. लोकनायक जेपी आणि डॉ.लोहीया यांचे आदर्श लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं.”
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “लोहिया यांच्या विचारांवर मुलायम सिंह यादव यांनी राजकीय वाटचाल केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात ते सक्रिय होते. संरक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी चांगली कामगिरी केली. विरोधकांनी एकत्र यावं अशी त्यांची भूमिका होती. मुलायम सिंह यादव यांच्या निधनामुळे वैयक्तिक नुकसान सुद्धा झालं आहे. समाजवादी चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे.”

