▪️नवनाथ शिराळे यांच्या समाजसेवेचा महायज्ञस्थळी गौरव
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैभवशाली आणि साधू-संतांच्या परंपरेने पावन झालेल्या श्री क्षेत्र पैठण येथे २७ महाकुंडी महायज्ञ आणि अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू आहे. ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र भूमीत ९ डिसेंबर ते १४ डिसेंबरदरम्यान धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे.
श्री शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज, वेदशास्त्र संपन्न श्री योगीराज महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुशल नियोजनातून या भव्य महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. काशी क्षेत्रातील वेदमूर्ती ब्रह्मवृंदांच्या पवित्र मंत्रोच्चारात पैठण नगरी दुमदुमून गेली आहे.
महायज्ञाबरोबरच सप्ताहांतार्गत पार पडत असलेल्या कार्यक्रमांमुळे संपूर्ण पैठण नगरीत श्रीहरी विष्णूच्या नामस्मरणाचा गजर, वेदमंत्रांचे निनाद आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. हजारो भाविकांनी येथे हजेरी लावून महायज्ञाचे दर्शन घेतले आहे. श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या परंपरेचे संवाहक श्री योगीराज महाराज यांनी महाराष्ट्रातील सर्व भाविकांना महायज्ञ आणि गंगामातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
▪️शिराळे यांचा महायज्ञस्थळी गौरव
देव-देश-धर्मासाठी सातत्याने कार्यरत असलेले भाजपा बीड जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांच्या समाजसेवेची दखल घेत प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचा महायज्ञस्थळी गौरव करण्यात आला. श्री योगीराज महाराजांच्या हस्ते शाल, श्री जनार्दन स्वामी, संत भानुदास महाराज व शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या दिव्य प्रतिमा देऊन अण्णांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आगामी सेवाकार्यासाठी श्री योगीराज महाराजांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला. दरम्यान प्रतिष्ठानतर्फे बीडचे माजी नगरसेवक बाबुराव परळकर, लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. वैद्य, मार्गदर्शक अनिल कचरे, आणि जिल्हा संघटक संजय देवा कुलकर्णी कुक्कडगावकर यांचाही सत्कार करण्यात आला.
