पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली शाब्बासकी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सदस्य नोंदणीचे टार्गेट बीड जिल्ह्याने मुदतीच्या आतच पूर्ण केल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बीड जिल्ह्याच्या पदाधिकार्यांचे कौतुक करत शाब्बासकीची थाप दिली. बीड जिल्ह्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर जिल्ह्यानेही सदस्य नोंदणीच्या कामासाठी मेहनत घ्यावी असे त्यांनी म्हटले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या १ नोव्हेंबरच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत बीड जिल्ह्यासाठी ५० हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट दिले होते. आठ दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची मुदतही दिली होती. सदस्य नोंदणीचे फॉर्म ३ नोव्हेंबरला जिल्हाप्रमुखांच्या हातात पडले. सदस्य नोंदणीचे काम हे झपाटल्यासारखे करावे लागणार असल्यामुळे संपर्क प्रमुख धोंडू पाटील बीड जिल्ह्यामध्ये आठ दिवस ठाण मांडून बसले. सर्व पदाधिकार्यांच्या सहकार्यामुळे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले उद्दिष्ट मुदतीच्या आत पूर्ण केले. शुक्रवारी ५० हजार ८९० सदस्य नोंदणीचे फॉर्म शिवसेना भवन येथे सुपुर्द करून मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांचा सत्कार केला.
मुदतीपूर्व उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांचे कौतुक करत शाब्बासकीची थाप दिली. याच ठिकाणी सोलापूर जिल्ह्याची बैठक सुरू होती. त्या बैठकीतील पदाधिकार्यांना बीडचा आदर्श घेण्याच्या सूचना देत अनिल जगताप यांनी हे काम कसे शक्य करून दाखवले ते सांगण्याचे आदेश दिले. बीड जिल्ह्याच्या वतीने धोंडू पाटील यांनी सांगताना म्हटले. बीड जिल्ह्यातील दोन जिल्हाप्रमुख आणि संपूर्ण पदाधिकार्यांच्या टिमने आठ दिवस प्रचंड मेहनत घेतली. गावागावात जावून सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले असे सांगितले. आज मातोश्रीवर केलेले कौतुक आम्हाला हत्तीचे बळ देवून गेले.
आगामी काळात अजून 50 हजार सदस्य नोंदणी पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया संपर्कप्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव यांनी दिली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या ही उपस्थित होत्या.

