बांबू उत्पादन ही शेतकरी वर्गासाठी मोठी उत्पन्नाचे साधन ठरेल – पाशा पटेल
By MahaTimes ऑनलाइन | बीड
बांबू पासून अनेक वस्तू उत्पादने तयार होतात व त्याचे अनेक उपयोग असून त्याचा फायदा शेतकरी वर्गास होऊ शकतो. वृक्ष लागवड प्राधान्याचा विषय असून जिल्ह्यात बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नियोजन केले जावे. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी यासाठी नियोजन आराखडे तयार करून सादर करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले.

बांबू लागवडीच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती या विषयावरील कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी माजी आमदार व केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, उपजिल्हाधिकारी रोहयो मच्छिंद्र सुकटे, जिल्हा विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री शर्मा म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी बांबू महत्त्वपूर्ण असून अगदीबांबू रोपांपासून खाद्यपदार्थ असलेली डिश आणि बांबू पासून बनवलेली घरे मणिपूर राज्यातमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. 2017 मध्ये केंद्र शासनाने बांबू चे वाहतूक व तोड करण्यावरील निर्बंध हटवले असून त्याचा फायदा बांबू उत्पादकांना होईल.
बांबू उत्पादन ही शेतकरी वर्गासाठी मोठी उत्पन्नाचे साधन ठरेल – पाशा पटेल

जगातील अनेक देशातील शास्त्रज्ञांच्या सहभागाने पर्यावरणातील बदलाबाबत अहवाल सादर केला. या अनुषंगाने मानव जातीस असलेला धोका समोर आला असून, त्यावर उपाययोजना केला जाव्यात. यासाठी जगातील सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख एकत्रित येऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर परिषदेमध्ये पृथ्वीचे तापमान वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एक मत झाले आहे असे श्री. पाशा पटेल म्हणाले. हवेतील प्रदूषण वाढविण्यामध्ये बॉयलर मधील दगडी कोळशाचा वापर, वाहनांमधील पेट्रोल व डिझेल सारख्या इंधनाचा वापर कारणीभूत आहे. वीज निर्मितीसाठी देखील औष्णिक वीज केंद्रांमध्ये दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. प्रदूषण कमी करून पृथ्वीवरील हवेतील कार्बनचे प्रमाण कमी राखतानाच हवेतील ऑक्सिजन पातळी चांगली राहिल्यास आपण येणाऱ्या पुढील पिढ्यांसाठी चांगले वातावरण ठेवले असे होईल असे ते म्हणाले.
दगडी कोळशाला पर्याय म्हणून बांबूचा वापर
श्री. पटेल यांनी सांगितले, बांबू पासून विविध वस्तू निर्मिती होतेच पण त्याचबरोबर दगडी कोळशाला पर्याय म्हणून बॉयलर मधील बांबू पॅलटेसचा वापर, इथेनॉल निर्मितीसाठी बांबूचा वापर केला जाऊ शकतो व येत्या काळात भारतासह जगातील विविध देश ऊर्जा निर्मितीसाठी प्रकल्पांमध्ये हा वापर सुरू करत आहेत त्या दृष्टीने पाऊल टाकली जात आहेत. शेतकरी वर्गासाठी यामुळे बांबू उत्पादन ही मोठी उत्पन्नाचे संधी ठरेल. शासनाच्या विविध योजना बांबू लागवडीसाठी अनुदान देणाऱ्या आहेत त्याचा वापर करून जिल्ह्यात बांबू लागवड वाढविण्यात यावी, असे आवाहन यावेळी पाशा पटेल यांनी केले.
ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी सहभागातून नियोजन
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजनातून बांबू लागवड करतानाच ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा परिषद, वनविभाग, महसूल , कृषी आदींच्या सहभागातून नियोजन करण्यात येत आहे.
बैठकीचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी रोहयो मच्छिंद्र सुकटे यांनी केले. बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

