राजेंद्र मस्के यांची आग्रही मागणी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : सतीश जारकीवली यांच्या हिंदुविरोधी द्वेषातून केलेल्या वक्तव्यामुळे समस्त हिंदू धर्मीय व शिवप्रेमी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राजकीय हेतूपोटी समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या अशा समाजकंटकाचा शासनाने बंदोबस्त केला पाहिजे. त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. अशी आग्रही मागणी बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.

परवा कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांनी हिंदू हा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ अत्यंत घाण आहे व हिंदू हा शब्द आमच्यावर का थोपवला जातोय हे हिंदू विरोधी वक्तव्य केले तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या धर्मवीर उपाधीचा व मराठ्यांचा अपमान करत धर्मवीर उपाधीसाठी मराठी लायक नाहीत असेही अत्यंत घृणास्पद वक्तव्य केले आहे.
या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी जि.प. सदस्य अशोक लोढा, डॉ. लक्ष्मण जाधव, प्रा. सचिन उबाळे, विलास बामणे, दत्ता परळकर, कपिल सौदा, विष्णू महाराज सुरवसे, बाळासाहेब घुमरे, सरपंच वसंत गुंदेकर, सरपंच महादेव नैराळे, सुधाकर चव्हाण, भीमा तुपे, बंडू मस्के, सचिन आगाम, शफिक काजी, शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिले.
मराठ्यांच्या इतिहासात शिवछत्रपती नंतर संभाजीराजेसारखा साहसी, पराक्रमी, स्वातंत्र्यप्रेमी आणि सुसंकृत दुसरा छत्रपती झाला नाही. शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्यवर हल्ला करणाऱ्या शत्रूंना पराजित करून आपला पराक्रम इतिहासात नोंदवला. मानेवर शत्रूंची तलवार असताना सुद्धा तसूभर डगमगले नाहीत. अशा तेजस्वी धर्मवीराबद्दल केवळ मराठेच नव्हे, तमाम हिंदू धर्मियांना त्यांच्या विषयी अढळ श्रद्धा आणि आदर आहे. यापुढे मराठ्यांच्या अस्मितेचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही. असा सूचक इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिला आहे.

