धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील तिघे अपघातात ठार झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील खजाना विहिरीजवळ घडला.

या अपघातातील मयतांची ओळख पटली असून कृष्णा भारत शेळके (वय 23,रा. दगडी शहाजानपूर, ता.बीड), पारसनाथ मनोहर रोहिटे (वय 22, रा. आहेर वडगाव ता. बीड) आणि अक्षय सुरेश मुळे (वय 22, रा. घोडकाराजुरी, ता.बीड) अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, आहेर वडगाव येथून बुधवारी सायंकाळी हे तिघे बुलेटवरुन (एम.एच. 23 एल 7227) बीडकडे येत होते. दरम्यान खजाना विहिरीजवळ त्यांना समोरुन येणा-या बसने (एम.एच. 14 बीटी 2455 ) जोराची धडक दिली. यामध्ये पारसनाथ व कृष्णा हे दोघे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी अक्षयचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती समजताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, जमादार प्रल्हाद चव्हाण, आनंद मस्के, पोलिस अंमलदार रवि सानप व चालक कृष्णात बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरचे वृत्त लिहीपर्यंत संबंधित ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

