प्रशासनाची तयारी पूर्ण; जिल्हाधिकाऱ्यांचा समाधानाचा शेरा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, परळी व अंबाजोगाई या सहा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी मा. विवेक जॉन्सन यांनी पोलीस अधीक्षक मा. नवनीत काँवत यांच्या उपस्थितीत आज (२८ नोव्हेंबर) घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या सर्व पथकांची तयारी पूर्ण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रशासनाच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक ती सूचनाही दिल्या.
मतदान केंद्रांवर कडक नियमावली
मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३(२) नुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू राहील. या परिसरात मतदारांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा मतदानाच्या गोपनीयतेला बाधा आणणारे कोणतेही उपकरण १०० मीटर परिसरात बाळगणे किंवा वापरणे सक्त मनाई आहे. (निवडणूक आयोगाने अधिकृत केलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना याला अपवाद.)
मतदार प्रतिनिधी किंवा इतर प्रतिनिधींनाही मतदान केंद्राच्या आत मोबाईल वापरणे, फोटो काढणे किंवा चित्रीकरण करण्यास बंदी आहे. मतदान प्रक्रियेची गुप्तता राखणे बंधनकारक आहे.
प्रचार बुथवरही निर्बंध
मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या बाहेर राजकीय पक्षांनी उभारलेल्या तात्पुरत्या बुथवर कोणतेही ध्वज, भिंतीपत्रक, चिन्ह वा प्रचार साहित्य लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
मतदानाचा दिवस जवळ येत असताना प्रशासनाने घेतलेल्या कडक उपाययोजनांमुळे मतदान सुरळीत व शांततेत पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
