शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विकासाभिमुख संकल्पपत्राचे अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सभा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असून सर्वत्र विकासकेंद्री राजकारणाला प्राधान्य दिले जात आहे. बीड शहरासाठीही विकासकेंद्री व्हिजन मांडण्यात आले असून दिलेला शब्द पाळण्याची ताकद भाजपमध्ये आहे. त्यामुळे बीडकरांनी भाजपवर विश्वास ठेवावा आणि शहराच्या अधिकाधिक विकासाची संधी सुज्ञपणे साधावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले.

शहरातील भाजप जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी (दि.२९) बीड शहरासाठी विकासाभिमुख संकल्पपत्र अर्थात जाहीरनाम्याचे अनावरण जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.ज्योती घुंबरे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, शहराध्यक्ष अशोक लोढा, प्रा.देविदास नागरगोजे, चंद्रकांत फड, जिल्हा सचिव शांतिनाथ डोरले, ज्येष्ठ नेते विजय पालसिंगणकर, इर्शाद शेख, संग्राम बांगर, ॲड.संगीता धसे, सुनील मिसाळ, गणेश लांडे, बालाजी पवार, जयश्री मुंडे, संध्या राजपूत, भाग्यश्री मुंडे, शैलाताई मुसळे, डॉ.लक्ष्मण जाधव, भूषण पवार, डॉ.अभय वनवे, डॉ. रमेश शिंदे, अक्षय रणखांब, अशोक इंगळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.ज्योती घुंबरे यांच्या विजयाचा निर्धार
बीड शहरात आतापर्यंत झालेली विकासकामे तसेच भविष्यात करावयाच्या कामांचा आराखडा या संकल्पपत्रात समाविष्ट आहे. जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवून तयार करण्यात आलेला हा जाहीरनामा आगामी विकासाचा मार्गदर्शक ठरणार आहे. बदलत्या बीडच्या आणखी सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.ज्योती घुंबरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा एकमुखी संकल्प या बैठकीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची जय्यत तयारी, आज सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि.१) बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या सभेसाठी शहरातील माने कॉम्प्लेक्स येथील मैदानाची साफसफाई सुरू आहे. भाजपकडून सभेसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.ज्योती घुंबरे यांच्या प्रचारार्थ ही विजय संकल्प सभा होणार आहे. या सभेला पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्यासह आमदार, वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर व शहराध्यक्ष अशोक लोढा यांनी दिली.
