बीडमध्ये भव्य सोहळ्याचे आयोजन; ऑल इंडिया मुशायरात देशभरातील नामवंत कवींचा सहभाग
By MahaTimes ऑनलाईन
बीड : बीड नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक सय्यद फारूक अली ऊर्फ फारूक पटेल यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मिलिया ग्राउंड (किल्ला मैदान) येथे आयोजित करण्यात आला आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त ऑल इंडिया मुशायर्याचेही आयोजन करण्यात आले आहे. या मुशायर्यात भारतातील विविध भागांतील प्रसिद्ध कवी आणि शायर सहभागी होणार असल्याने साहित्यप्रेमींना काव्याची मेजवानी मिळणार आहे.

.
फारूक पटेल यांनी नगरसेवक म्हणून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सत्कार सोहळ्यासह मुशायरा हा कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी फाउंडेशनच्या वतीने पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सत्कार समिती, पुरस्कार निवड समिती, मुशायरा समितीसह विविध समित्यांचे गठन करण्यात आले. प्रत्येक समितीवर स्वतंत्र जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
बैठकीला ज्येष्ठ नगरसेवक मोईन मास्टर, जलील खान पठाण, सी. आर. पटेल, नगरसेवक शेख बिलाल, माजी नगरसेवक शकील खान, शेख इलियास बिल्डर, सय्यद इफ्तेखार, माजी नगरसेवक शेख युनूस यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला नागरिक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
