By MahaTimes ऑनलाइन
बीड : शिरूर कासार तालुक्यातील मानूर-दहिफळे वस्तीजवळील समाधान हॉटेलसमोर भीषण अपघातात दुचाकीने पेट घेतल्याने दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील टाकळी (अंबिका नगर) येथील इकबाल अत्तार (वय ३२) व शफीक शेख (वय ४०) हे दोघे पाथर्डीहून अंबिका नगरकडे दुचाकीवरून जात होते. मानूर-दहिफळे वस्तीजवळील समाधान हॉटेलसमोर अचानक समोर आलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला त्यांची दुचाकी जोरात धडकली. धडकेनंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत इकबाल अत्तार यांच्या भावाचे वर्षभरापूर्वी अपघातात निधन झाले होते. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या आईचे हृदयविकाराने निधन झाले होते. कुटुंबाचा प्रमुख आधार असलेले इकबाल यांच्या निधनाने पत्नी, मुलगी, वडील आणि भावजयी वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तर शफीक शेख हे कुटुंबातील एकुलते एक आधार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई, असा परिवार असून या घटनेने संपूर्ण कुटुंब निराधार झाले आहे.
