▪भरधाव कारच्या धडकेत दुसरी महिला अधिकारी गंभीर जखमी
अंगणवाडी केंद्रांच्या भेटीदरम्यान लातूर जिल्ह्यात भीषण अपघात
By Maha Times ऑनलइन
बीड : शासकीय कर्तव्य बजावत असताना भरधाव कारच्या भीषण धडकेत एकात्मिक बालविकास प्रकल्पातील महिला पर्यवेक्षिकेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला अधिकारी गंभीर जखमी झाली. ही दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील चामरगा पाटीजवळ उदगीर-लातूर महामार्गावर शुक्रवारी (दि.२२) सकाळी घडली.

तनुजा घोडके-शिंदे (वय ३२, रा. तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिला पर्यवेक्षिकेचे नाव आहे. तर अनुसया खलंग्रे (रा. कवठाळा, ता. चाकूर) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर अनंतपाळ पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिका अनुसया खलंग्रे आणि तनुजा घोडके-शिंदे या नेहमीप्रमाणे शासकीय कामकाजासाठी बाहेर पडल्या होत्या. चामरगा येथील अंगणवाडी केंद्राची पाहणी केल्यानंतर त्या दुचाकीवरून डिगोळ येथील दुसऱ्या अंगणवाडीकडे निघाल्या होत्या.
दरम्यान, चामरगा पाटीजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एसटी बसच्या बाजूने जात असताना उदगीरकडून लातूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. एमएच-५५ बी-०१३९) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही महिला महामार्गावर दूरवर फेकल्या गेल्या. यात तनुजा घोडके-शिंदे यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघींना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तनुजा यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या अनुसया खलंग्रे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
तनुजा घोडके-शिंदे यांच्या पश्चात पती, एक लहान मुलगा तसेच सासर-माहेरचा मोठा परिवार आहे. त्यांच्या मूळ गावी तलवाडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून कार जप्त करण्यात आली आहे.
