महाराष्ट्रासाठी ठरू शकतो आदर्श मॉडेल
By Mahatimes ऑनलाइन
बीड : गुन्हे तपास प्रक्रियेला अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक बनविण्यासाठी बीड पोलीस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अत्याधुनिक “DeepEye” प्रणाली विकसित केली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पामुळे तपास प्रक्रियेत डिजिटल क्रांती घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रणालीची सुरुवात बीड शहर पोलीस ठाण्यात पायलट प्रकल्पाच्या स्वरूपात करण्यात येत असून, यशस्वी अंमलबजावणीनंतर ती राज्यभर विस्तारली जाऊ शकते.

एफआयआर नोंदणीपासून ते आरोपपत्र दाखल होईपर्यंत संपूर्ण तपास प्रक्रिया डिजिटल आणि एकात्मिक पद्धतीने हाताळण्याची क्षमता “DeepEye” मध्ये आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या ३० हून अधिक भौतिक नोंदवह्यांच्या ऐवजी सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ही प्रणाली मोबाइल अॅप तसेच वेब प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने एफआयआरचे स्वयंचलित विश्लेषण, संबंधित कायद्यांची कलमे सुचविणे, वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींची ओळख तसेच गुन्हेगारी पॅटर्नचा अभ्यास या प्रणालीद्वारे केला जातो. विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाल्यास तत्काळ अलर्ट देण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात येते. महिलांच्या सुरक्षेसाठी संवेदनशील क्षेत्रांची ओळख करून प्रतिबंधात्मक पोलिसिंग अधिक प्रभावी करण्यावरही भर देण्यात आला आहे.
तांत्रिक तपासासाठी फेस रिकग्निशन, वाहन ओळख प्रणाली, सीसीटीव्ही मॉनिटरिंग, सीडीआर इंटेलिजन्स आणि डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. तसेच सर्व गुन्हे, अधिकारी आणि तपासाशी संबंधित माहितीचे एकात्मिक व्यवस्थापनही या प्रणालीत शक्य होणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी रिअल-टाइम डॅशबोर्डची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे एकूण एफआयआर, प्रलंबित प्रकरणे, सुरू असलेले तपास, अधिकारीनिहाय कामाचा ताण, तपासातील विलंब आणि प्रकरणांच्या स्थितीचे सखोल विश्लेषण करता येणार आहे. यामुळे तपासातील अडथळे कमी होऊन कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
याशिवाय जिओ-स्पेशियल विश्लेषणाद्वारे गुन्ह्यांचे मॅपिंग, हॉटस्पॉट्सची ओळख, गुन्ह्यांचे प्रकार आणि ट्रेंडचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आखणी करता येणार आहे. ई-एफआयआर, व्हॉइस-बेस्ड एफआयआर नोंदणी तसेच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसारख्या सुरक्षा सुविधाही या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, “DeepEye” प्रणालीचे तांत्रिक विकासकार्य Hobics Services Private Limited कंपनीमार्फत करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलीस प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.
