𝐁𝐲 𝐌𝐚𝐡𝐚 𝐭𝐢𝐦𝐞𝐬 ऑनलाइन
बीड :- सौर कृषी पंप मंजुरीसाठी तक्रारदारांकडून एक हजार रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील (महावितरण) वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई रविवारी वडवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

आरोपी लोकसेवकाचे नाव कृष्णा आश्रूबा पाळवदे (वय ३३, रा. मोहा ता. परळी, ह.मु. परळी) असे आहे. तो तेलगाव उपविभागांतर्गत कुप्पा गाव येथे वरिष्ठ तंत्रज्ञ (वर्ग-४) म्हणून कार्यरत आहे. तक्रारदारांना ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेंतर्गत पंप मंजूर होता; त्यानंतर पाळवदे यांनी पंपाच्या विसर्जनासाठी तक्रारदारांकडून एक हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार १८ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथे दाखल करण्यात आल्याचे विभागाने नोंदवले.
पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्या पथकाने पंचासमक्ष तपासणी केली असता लाच मागणीची माहिती पुष्टी झाली. त्यानंतर सापळा रचून आरोपी लोकसेवक पाळवदे याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. वडवणी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलिस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, पोलीस निरीक्षक समाधान कवडे व त्यांच्या पथकाने केली.
