▪️ ‘हिट स्ट्रोक’ रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर▪️
उष्माघात जीवघेणाही ठरू शकतो, काळजी घ्या : जिल्हाधिकारी जॉन्सन
By MahaTimes ऑनलाइन
बीड : एप्रिल-मेच्या रणरणत्या उन्हाने बीडकर अक्षरशः होरपळून निघत आहेत. यंदा तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडल्याने जिल्हा प्रशासनाने उष्माघात प्रतिबंध मोहिमेला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघाताची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका शेतकरी, बांधकाम मजूर, रस्ते कामगार आणि मैदानी श्रमिकांना बसत आहे. तब्बल २८ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या बीड जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरांमध्येही उष्णतेची झळ तीव्रतेने जाणवत आहे.
“उष्माघात हा साधा त्रास नाही; तो जीवघेणाही ठरू शकतो. सर्व विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्पष्ट केले. दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायत कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व सावलीची व्यवस्था करण्यात येत आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात आला असून उष्माघातग्रस्तांसाठी स्वतंत्र उपचार कक्ष आणि औषधसाठाही सज्ज ठेवण्यात आला आहे.
बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की, गावागावांत ग्रामसेवक, तलाठी, आशा कार्यकर्त्या आणि शिक्षकांच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला आणि मैदानी कामगारांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उष्माघाताची लक्षणे कोणती?
अतिघाम येणे, चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या, त्वचा कोरडी पडणे, ताप वाढणे आणि शुद्ध हरपणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. अशा वेळी रुग्णाला तातडीने सावलीत हलवून पाणी द्यावे व जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात उपचारासाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रशासनाचा नागरिकांना सल्ला
भरपूर पाणी, ORS व लिंबूपाणी घ्या
हलके सुती कपडे वापरा
डोक्यावर टोपी किंवा कापड ठेवा
दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा
वाहनात लहान मुले व वृद्धांना एकटे सोडू नका
शेतकरी व मजुरांनी सकाळ-सायंकाळ कामाला प्राधान्य द्यावे
