उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध लागू राहणार
By MahaTimes ऑनलइन
बीड : गेवराई नगरपरिषद प्रभाग क्रमांक ११ मधील रिक्त पदाच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीची घोषणा होताच जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी विविध 11 निर्बंधात्मक आदेश जारी केले आहेत.

आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचार सभा, वाहन ताफे, ध्वनीक्षेपक, पोस्टर्स-बॅनर्स, मोर्चे, आंदोलनांसह अनेक बाबींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते किंवा हितचिंतकांनी शासकीय-निमशासकीय कार्यालये, विश्रामगृहे, सार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांवर सभा, मिरवणुका, घोषणा, प्रचार साहित्य लावणे, भित्तीपत्रके चिकटवणे किंवा कोणत्याही प्रकारे निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.निवडणूक प्रक्रियेदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होऊ नये म्हणून बॅनर्स, होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि जाहिरातींसाठी संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.
प्रचार फेरी आणि मिरवणुकांमध्ये जास्तीत जास्त दहा वाहनांनाच परवानगी देण्यात आली असून नामनिर्देशन अर्ज दाखल करताना उमेदवारांच्या ताफ्यात तीनपेक्षा अधिक वाहने असू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात उमेदवारासह केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. कार्यालय परिसरात घोषणा, वाद्य, सभा किंवा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
निवडणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ध्वनीक्षेपक वापरावरही कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. पोलीस परवानगीशिवाय ध्वनीक्षेपक वापरता येणार नाहीत. सकाळी ६ पूर्वी आणि रात्री १० नंतर प्रचारासाठी लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. फिरत्या वाहनांवर मोठ्या आवाजात प्रचार करण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे.
धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणांच्या आसपास तात्पुरती पक्ष कार्यालये उभारण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तांवर मालकाची व संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय झेंडे, फलक, पोस्टर्स किंवा घोषणा लावता येणार नाहीत.
दरम्यान, धरणे आंदोलन, मोर्चे, निदर्शने, उपोषणे यांसारख्या आंदोलनात्मक कार्यक्रमांवरही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे सर्व आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत जारी करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे.
२० जूनला मतदान, २३ रोजी मतमोजणी व निकाल
गेवराईनगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.
दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवार दुर्दाना बेगम सलीम फारुकी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दोन सदस्यीय प्रभाग असल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ नुसार संपूर्ण प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर २ डिसेंबर २०२५ रोजी इतर सर्व प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडून नगरसेवक निवडून आले; मात्र प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणूक दीर्घकाळ प्रलंबितच राहिली होती.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. १८ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दि. २० जून २०२६ रोजी मतदान होणार असून दि. २३ जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ११ सह इतर काही नगरपरिषदांमधील रिक्त पदांसाठी हा कार्यक्रम लागू करण्यात आला आहे.
