१६ मे ते १४ जून दरम्यान घरभेटीदरम्यान अचूक माहिती द्या , प्रशासनाला सहकार्य करा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
By MahaTimes ऑनलाइन
बीड : भारताच्या १६ व्या राष्ट्रीय जनगणना २०२७ अंतर्गत स्व – गणना टप्प्यानंतर आता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जनगणनेचे काम सुरू झाले असून १६ मेपासून बीड तालुक्यात प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देत आहेत. नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

भारत सरकार व राज्य शासनाच्या निर्देशानुसार यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे . स्व – गणना सुविधा १ मे ते १५ मे या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली होती . त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरभेटीद्वारे माहिती पडताळणी व नोंदणी करीत आहेत.
जनगणना ही देशाच्या भविष्यातील विकास आराखड्याचा पाया मानली जाते. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, घरकुल, रोजगार, शेती, अन्नसुरक्षा आणि विविध शासकीय योजनांचे नियोजन जनगणनेतील आकडेवारीच्या आधारे केले जाते. जनगणना २०२७ ही भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना मानली जात असून मोबाईल आधारित प्रणाली , डिजिटल मॅपिंग आणि रिअल टाइम मॉनिटरिंगच्या माध्यमातून माहिती संकलित केली जात आहे . देशभरात लाखो प्रगणक आणि पर्यवेक्षक या मोहिमेत सहभागी झाले आहेत .
.जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की , जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून प्रशासनासाठी महत्त्वाचा डेटा संकलन उपक्रम आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती लपवू नये किंवा चुकीची देऊ नये. अचूक माहितीमुळे शासनाला विकास योजनांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते. जनगणनेदरम्यान येणाऱ्या अधिकृत प्रगणकांना सहकार्य करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
▪️जनगणनेत दिलेली माहिती कायद्याने संरक्षित
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जनगणना अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सांगितले की, जनगणना प्रक्रियेमध्ये गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये. जनगणनेत दिलेली माहिती कायद्याने संरक्षित असते आणि ती कोणत्याही कर, पोलीस किंवा न्यायालयीन कारवाईसाठी वापरली जात नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.
बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी नागरिकांना प्रगणकांना योग्य माहिती देताना आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवण्याचे आवाहन केले आहे. घरातील सदस्यांची संख्या, शिक्षण, व्यवसाय, स्थलांतर, पाणीपुरवठा, स्वच्छता सुविधा, इंटरनेट वापर, वाहनांची संख्या, घराची स्थिती, इंधन वापर आणि इतर मूलभूत माहिती विचारली जाणार आहे. नागरिकांनी शांतपणे आणि संयमाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे त्यांनी नमूद केले.
तालुका चार्ज अधिकारी तथा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की , बीड तालुक्यातील ग्रामीण भागातील २३६ गावांमध्ये जनगणनेची यंत्रणा सज्ज झाली आहे . यासाठी मोठ्या प्रमाणात प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून महसूल, पंचायत राज, शिक्षण आणि इतर विभागांचे अधिकारी समन्वयाने काम करत आहेत. “प्रगणक आपल्या घरी आल्यानंतर नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे. स्व – गणना केलेल्या नागरिकांनी आपला SE ID क्रमांक उपलब्ध करून द्यावा . त्यामुळे पडताळणी प्रक्रिया अधिक वेगवान होईल,” असे आवाहन त्यांनी केले.
▪️नागरिकांना सावध राहावे
प्रशासनाने नागरिकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचेही आवाहन केले आहे . जनगणनेच्या नावाखाली कोणतीही बनावट लिंक, कॉल किंवा OTP मागविण्याचे प्रकार आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा l. अधिकृत प्रगणकांकडे ओळखपत्र असणार असून QR कोड पडताळणी सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
